आषाढी वारीपूर्वी वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! १,४०० दिंड्यांना मिळणार प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारकरी संप्रदायासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूरकडे मानाच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, संबंधित शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

आषाढी वारीला महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि दिंड्यांवरील आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
सरकारच्या निर्णयानुसार, यंदाच्या वारीत मानाच्या १० पालख्यांसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीचे वितरण आणि संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि सामाजिक समतेचा महत्त्वाचा वारसा आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. त्यांना अधिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने २०२४ मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्याच माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार असून राज्याच्या विविध भागांतून पालख्या आणि दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. बुलढाणा येथून श्री संत गजानन महाराज, जळगाव येथून संत मुक्ताई, तसेच लवकरच देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या प्रस्थान करणार आहेत.
लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारीसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेचा आढावा घेतला असून, वारकरी परंपरेचे जतन आणि वारकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.