वीकेंडला लोणावळ्याला जाण्याचा प्लॅन आहे? मग आधी ‘ही’ बातमी नक्की वाचा

पुणे : पावसाने पुन्हा जोर धरताच लोणावळा परिसरातील निसर्ग खुलून आला असून, पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले भुशी धरण यंदाच्या पावसात प्रथमच ओव्हरफ्लो झाले आहे. अवघ्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्याने परिसराला मनमोहक रूप प्राप्त झाले आहे.

मुंबई आणि पुणे परिसरातील पर्यटकांसाठी पावसाळा म्हणजे लोणावळा, खंडाळा, भुशी धरण, कर्जत, बदलापूर आणि माथेरानची सफर. यंदाही जुलैच्या सुरुवातीलाच दमदार पावसामुळे वर्षाविहाराचा हंगाम रंगात आला असून, पर्यटकांची पावले पुन्हा एकदा या पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत.
विशेषतः भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे दाखल होतात. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर, कोसळणारे धबधबे आणि फेसाळणारे पाणी यामुळे संपूर्ण परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

यंदा मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले असले तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले. लोणावळा-खंडाळा परिसरात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे धबधबे पुन्हा प्रवाहित झाले असून, निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, अवघ्या ४८ तासांत २२९ मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर भुशी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून वेगाने वाहणारे पाणी आणि परिसरातील नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
मात्र, प्रशासनाने पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यास धरणाच्या सांडव्यावर किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितपणे वर्षाविहाराचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.