पुढील काही तास महत्त्वाचे! ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन करत मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसह परिसरासाठी तातडीचा इशारा जारी केला असून, पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अलर्टनुसार, मुंबई शहर, उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढील काही तासांत अतिवृष्टीची शक्यता आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. अंधेरी येथील भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतरच तो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे सेवाही पावसाच्या तडाख्यामुळे विस्कळीत झाली आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील अनेक गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. वांद्रे येथील कलानगर परिसरातही रात्रभर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

ठाणे शहरातही पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू असून, अधिकृत आकडेवारीनुसार रात्री १२ वाजेपासून २६ मिमी, तर गेल्या २४ तासांत एकूण ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने ठाण्यात दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
दुसरीकडे, कोकण किनारपट्टीवरही पावसाने धुमाकूळ घातला असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.