पुण्यात धक्कादायक प्रकार! वृद्ध आईसाठी घरात ठेवल्या ४ केअरटेकर; एका महिलेने रचला असा मास्टरप्लॅन की पोलीसही चक्रावले

पुणे : पुण्यातील विमाननगर परिसरात विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ८० वर्षीय वृद्ध महिलेची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकरनेच घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी महिलेने चक्क वृद्धेच्या हातातील खऱ्या सोन्याच्या बांगड्या काढून त्यांच्या जागी हुबेहूब बनावट बांगड्या घातल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी अनिता रामचंद्र सुतार (वय ४५, रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) हिला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. अजय राजकुमार कनोत्रा (वय ५९, रा. कोनार्क कॅम्पस, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कनोत्रा हे आपल्या ८० वर्षीय आईसोबत राहत असून तिच्या देखभालीसाठी त्यांनी चार महिला केअरटेकर नेमल्या होत्या. त्यापैकी अनिता सुतार ही वृद्ध महिलेसोबत घरातच राहत होती.

२१ मे रोजी अनितानेच अजय कनोत्रा यांना वृद्ध महिलेच्या हातातील चार सोन्याच्या बांगड्यांपैकी एक बांगडी हरवल्याची माहिती दिली. शोध घेऊनही ती न सापडल्याने अजय यांनी खबरदारी म्हणून उर्वरित तीन बांगड्यांचे मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवले आणि कामानिमित्त गुवाहाटीला रवाना झाले.

७ जून रोजी ते परतल्यानंतर १० जूनला अनिताने गावी जाण्यासाठी सुट्टी घेतली. दरम्यान, १५ जून रोजी आईच्या हातातील बांगड्या पाहताना त्या काहीशा वेगळ्या वाटल्याने अजय यांनी मोबाईलमधील जुने फोटो तपासले. त्यावेळी खऱ्या सोन्याच्या बांगड्यांच्या जागी हुबेहूब बनावट बांगड्या घालण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी तातडीने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सुमारे ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी चारही केअरटेकरची चौकशी केली. अनिता सुतारच्या जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. अखेर तिनेच चोरीची कबुली दिली.
पोलिसांच्या तपासात अनिताने प्रथम एक बांगडी चोरल्यानंतर उर्वरित खऱ्या बांगड्या काढून त्यांच्या जागी हुबेहूब बनावट बांगड्या ठेवून चोरी लपविण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. तिच्याकडून चोरीच्या सोन्याच्या बांगड्यांसह घरातील चांदीचे ग्लास, निरंजन आणि अन्य साहित्य असा सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल गुंड करत आहेत.