दारूची बाटली, चेतनची मिठी अन् सियाचा Viral Video; केतन अग्रवाल प्रकरणात नवा ट्विस्ट?

पुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन व्हिडिओंनी नव्या चर्चांना उधाण आले आहे. व्हिडिओमध्ये आरोपी सिया गोयल एका पबमध्ये हातात दारूची बाटली घेतल्याचे, तर दुसऱ्या क्लिपमध्ये चेतन चौधरीसोबत अतिशय जवळीक साधल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओंची सत्यता आणि ते नेमके कधीचे आहेत, याबाबत मात्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, केतनच्या कुटुंबीयांनी यापूर्वी सिया दारूचे सेवन करत असल्याची माहिती त्यांच्यापासून लपवण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हे व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतन आणि सियाचा विवाह नोव्हेंबरमध्ये होणार होता. याचबरोबर सियाचा भाऊ साहिल आणि केतनच्या बहिणीचाही विवाह ठरण्याची चर्चा होती. पोलिसांनी साहिलची अनेक तास चौकशी केली असून सिया आणि चेतन यांच्या संबंधांबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आले आहेत.

साहिलने माध्यमांशी बोलताना, सियाने केतनसोबतचे संबंध संपल्याची शपथ घेतली होती आणि ती लग्नाबाबत आनंदी असल्याचे सांगितले. प्री-वेडिंग फोटोशूटची तयारीही सुरू होती, असा दावा त्याने केला. मात्र, तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, साहिलला सिया आणि चेतन यांच्या नात्याची पूर्वकल्पना होती का, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओंमुळे या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांकडून डिजिटल पुरावे आणि सोशल मीडिया सामग्रीचीही पडताळणी केली जात आहे. या व्हिडिओंचा तपासावर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.