पुण्याच्या राजकारणावर शोककळा! पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे यांचे दुःखद निधन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर सोपानराव कामठे (वय ६३, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांचे बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालिंदर कामठे हे दररोजप्रमाणे सकाळी फिरायला जात असत. मात्र बुधवारी सकाळी उशीर होऊनही ते खोलीबाहेर आले नाहीत. त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
त्यानंतर त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

जालिंदर कामठे यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

दरम्यान, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या आई हौसाबाई कामठे यांचे निधन झाले होते. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच जालिंदर कामठे यांच्या आकस्मिक निधनाने कामठे कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.