जमिनीच्या वादातून ‘बाऊन्सर’ घेऊन शेतावर धाड; महिलेला धक्काबुक्की केल्याप्रकरणी कदमवाकस्तीच्या माजी सरपंचांसह १६ जनांवर गुन्हा दाखल..


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कवडीगाव येथे सुरू असलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असतानाही १० ते १२ जणांना सोबत घेऊन शेतात जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला, महिलांना धक्काबुक्की करण्यात आली, पिकांची नासधूस करून शेतात डेमो हाऊस उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यांवरुन कदमवाकस्तीच्या माजी सरपंचांसह १६ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सविता दादासो झगडे (रा. कवडीगाव, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ओम गायकवाड व इतर १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गट क्रमांक ४२४ मधील सुमारे ७४ गुंठे वडिलोपार्जित जमीन त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात असून या जमिनीसंदर्भातील फेरफार व मोजणीचा वाद सध्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात न्यायप्रविष्ट आहे. २९ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्या व त्यांचे नातेवाईक शेतात मुळा खुरपत असताना चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ओम गायकवाड व इतर १० ते १२ जण इनोव्हा, आय-टेन, ट्रॅक्टर आणि छोटा हत्ती टेम्पोमधून घटनास्थळी आले. संबंधितांनी शेत आपले असल्याचा दावा करत महिलांना हाताला धरून शेताबाहेर ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर ट्रॅक्टरने शेत नांगरून मुळा व मक्याच्या पिकांचे नुकसान करण्यात आले, तसेच पाण्याची पाइपलाइन तोडण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. संध्याकाळी पुन्हा क्रेनच्या सहाय्याने शेतात डेमो हाऊस उभारण्यात आले. याला विरोध करणारे हर्षल झगडे व प्रणव झगडे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तसेच शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यापूर्वीही एप्रिल २०२६ मध्ये याच जमिनीच्या वादातून झगडे कुटुंबीयांवर मारहाणीची घटना घडली असून त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

या प्रकरणी सविता झगडे यांनी चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ओम गायकवाड, गौरी गायकवाड यांच्या भावाची पत्नी तसेच १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, अतिक्रमण, मारहाण, धमकी आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!