मोठं वळण! केतन अग्रवाल प्रकरणात AIची एन्ट्री; पोलिसांच्या नव्या तपासातून काय उलगडणार?

पुणे : लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाच्या तपासात आता महत्त्वाचे वळण आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपासासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तपासादरम्यान आता आरोपी चेतन चौधरीचे ‘गेट ॲनालिसिस’ (Gait Analysis) करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि न्यायवैद्यक तंत्रज्ञानाच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीची चेतनच्या चालण्याशी तुलना केली जाणार आहे.
पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्हीमध्ये हुडी घालून चालणारी एक व्यक्ती दिसत आहे. आरोपी चेतनलाही त्याच प्रकारची हुडी परिधान करून त्याच परिसरात चालण्यास सांगितले जाणार असून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल. त्यानंतर दोन्ही फुटेजमधील चालण्याच्या हालचालींची तांत्रिक तुलना करून ती व्यक्ती चेतनच आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे.

सामान्यतः आरोपी चेहरा झाकण्यासाठी मास्क, हेल्मेट किंवा हुडीचा वापर करत असल्यास ओळख पटवण्यासाठी ‘गेट ॲनालिसिस’ तंत्राचा वापर केला जातो. पोलिसांच्या मते, घटनेच्या दिवशी चेतन चौधरी हुडी घालून लोहगडावर गेला होता.

दरम्यान, तपासात आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले की, आरोपींनी घटनेपूर्वी लोहगड किल्ल्यावर जाऊन केतनला ज्या ठिकाणावरून खाली ढकलल्याचा आरोप आहे, त्या परिसराची पाहणी केली होती. या मुद्द्यावर सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले.
याशिवाय, आरोपींनी वापरलेला डिजिटल डेटा डिलीट केल्याचा संशय असून तो पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासात मृत केतन अग्रवालचा हरवलेला पासपोर्ट शोधणे, घटनास्थळाची पुन्हा पडताळणी करणे आणि दोन्ही आरोपींच्या हालचालींचा तपशील तपासणे ही कामेही सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २८ जून रोजी सिया गोयलच्या जबाबाच्या आधारे घटनास्थळी सीन रिक्रिएशन करण्यात आले होते. आता चेतन चौधरीकडून मिळालेल्या माहितीसोबत त्याची पडताळणी केली जाणार आहे. तसेच, घटनेच्या दिवशी दोन्ही आरोपींनी किल्ल्यावर काही व्यक्तींशी संवाद साधल्याची माहितीही तपासातून समोर आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा तपास सुरू आहे.