धक्कादायक प्रकाराने माऊलींची आळंदी हादरली! भावाबहिणीचेच लावले लग्न, विवाह संस्थांच्या पडताळणीवर प्रश्नचिन्ह…

बारामती : प्रेमविवाह आणि तत्काळ विवाहासाठी राज्यभरातील अनेक जोडप्यांची पहिली पसंती ठरत असलेल्या आळंदीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील एक तरुण आणि तरुणी यांचे लग्न आळंदीतील एका खासगी विवाह संस्थेमार्फत लावून देण्यात आले. मात्र, लग्नानंतर दोघेही एकाच भावकीतील असून नात्याने भाऊ-बहिण लागतात, अशी माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. मात्र, संबंधित तरुण-तरुणी हे लग्न कायम ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे सामाजिक, कायदेशीर आणि नैतिक अशा अनेक प्रश्नांना तोंड फुटले आहे.
आळंदीत दररोज शेकडो प्रेमविवाह, कोर्ट मॅरेज आणि नोंदणीकृत विवाह होत असतात. राज्यभर सोशल मीडियावर विविध विवाह संस्थांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या जाहिरातींमध्ये कमी वेळात आणि कमी खर्चात प्रेमविवाह, कोर्ट मॅरेज, रजिस्टर मॅरेज आणि तात्काळ विवाह करून देण्याचे दावे केले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी अवघ्या १५ हजार रुपयांत आणि तासाभराच्या आत विवाह लावून दिला जातो. त्यामुळे घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांची आळंदीला मोठी पसंती आहे.

मात्र, या ताज्या घटनेनंतर विवाहापूर्वी वधू-वरांच्या नातेसंबंधांची, कौटुंबिक पार्श्वभूमीची आणि आवश्यक कागदपत्रांची पुरेशी पडताळणी केली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आणि राहत्या पत्त्याचा पुरावा यांसारख्या कागदपत्रांच्या आधारे विवाह प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. विवाहानंतर संबंधित जोडप्याला तत्काळ प्रमाणपत्रही दिले जाते.
आळंदीत सुमारे १५० विवाह कार्यालये आणि ५०० हून अधिक धर्मशाळा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशा विवाह संस्थांवर अधिक प्रभावी नियंत्रण आणि पडताळणीची प्रक्रिया बंधनकारक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.