शेतकरी कर्जमाफीला ब्रेक! 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतरच लाभ मिळणार असल्याची सरकारची माहिती

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची डेडलाईन पूर्ण होणार नाही, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे. आता ही कर्जमाफी 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले की, कर्जमाफी योजनेतील अटी आणि निकषांवर सध्या सविस्तर चर्चा सुरू आहे. काही निकषांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. योजनेचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल आणि त्यानंतरच प्रत्यक्ष निधी शेतकऱ्यांना मिळेल.
सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील सुमारे 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही कृषीमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

दरम्यान, या निर्णयावर विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका करत हा निर्णय ‘टाईमपास’ असल्याचा आरोप केला आहे. वारंवार तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे निधी उपलब्ध असूनही कर्जमाफी विलंबित केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच कोणत्याही कठोर निकषांशिवाय सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष आता 5 जुलैनंतर होणाऱ्या कर्जमाफीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे.