टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिघे ताब्यात, आता परीक्षा कधी होणार?


मुंबई : राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवार (28 जून) रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच बाहेर आल्याची माहिती समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी NEET 2026 पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली होती. त्यानंतर आता टीईटी परीक्षेवरही पेपरफुटीचे सावट आल्याने उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणाचा धागा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे सापडला. कोनगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर डायमंड हॉटेलवर छापा टाकण्यात आला. मात्र पोलिस पोहोचण्यापूर्वीच संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते.

यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी सहारा विमानतळ परिसरातून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्या ताब्यातून टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांना पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणण्यात आले असून, कोनगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संशयितांकडील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जुळत असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

परीक्षा परिषदेची मोठी घोषणा

पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून नव्या तारखेची घोषणा लवकरच केली जाईल. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नव्याने परीक्षा आयोजित करण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

6 लाखांहून अधिक उमेदवारांना दिलासा

परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. 6 लाख 1 हजारांहून अधिक उमेदवारांची नोंदणी कायम राहणार असून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. पुढील 2 ते 3 दिवसांत नवीन परीक्षा तारीख जाहीर केली जाईल. राज्यातील 37 शहरांतील 1028 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे.

टीईटी पेपरफुटी कशी उघडकीस आली?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून रोजी राज्यभरात टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. NEET 2026 मधील गैरप्रकार लक्षात घेऊन यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, 27 जूनच्या पहाटे भिवंडी पोलिसांना काही व्यक्तींकडे प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीय माहिती असल्याची खबर मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांकडे मिळालेल्या माहितीची परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली. त्यानंतर पेपरफुटीची शक्यता लक्षात घेऊन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!