‘राजीनामा देऊन भाजपमध्ये जा’; विश्वास नांगरे पाटील यांच्यावर राज ठाकरेंचा घणाघात, सरकारलाही सुनावले खडेबोल

नागपूर : नागपूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर विश्वास नांगरे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना त्यांना थेट सल्लाही दिला. “तुम्ही एक सक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. मात्र कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेपुढे तुमची सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवू नका,” असे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, “एका पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा केवळ संविधान, कायदा आणि पोलीस दलाच्या कर्तव्याशी असली पाहिजे. जर एखाद्या संघटनेबद्दल इतकीच आपुलकी असेल, तर सरकारी सेवेचा राजीनामा द्या आणि उघडपणे त्या संघटनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करा.”

यावेळी त्यांनी सरकारवरही निशाणा साधला. “अधिकाऱ्यांची अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कशी मान्य आहे? आज यावर गप्प राहिलात, तर उद्या दुसऱ्या कोणत्याही संघटनेच्या कार्यक्रमात अधिकारी सहभागी झाल्यास आक्षेप घेण्याचा नैतिक अधिकार सरकारकडे राहणार नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विश्वास नांगरे पाटील यांच्या खाकी वर्दीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “आम्हाला वाटायचे हा खाकी रंग पोलीस दलाचा आहे. मात्र तो संघाच्या जुन्या खाकी चड्डीशी जोडला जात असल्याचे आता दिसत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ राज ठाकरे यांनी २०१२ मधील रझा अकादमी आंदोलनाचा संदर्भ दिला. त्यावेळी एका पोलीस कॉन्स्टेबलने मनसेच्या भूमिकेचे समर्थन केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याच निकषावर आता विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रकरणातही सरकार भूमिका घेणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषणावरून सुरू झालेला हा वाद आता अधिक तीव्र होत असून, यावर सरकार किंवा पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.