मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का; विलास घुले हत्या प्रकरणात मुलाची SIT चौकशी, बीडमध्ये खळबळ


बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात विशेष तपास पथकाने (SIT) खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांना चौकशीसाठी बोलावले असून, ते आज स्वतः केज पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांचे नाव नमूद करण्यात आल्याने एसआयटीने त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे आणि सौरव सोनवणे यांनी पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका जाहीरपणे मांडली होती. त्यानुसार सौरव सोनवणे चौकशीसाठी स्वतःहून उपस्थित राहणार असल्याचे समजते.

दरम्यान, काल एसआयटी आणि फॉरेन्सिक पथकाने खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी भेट देत तपास केला होता. विविध तपास यंत्रणांनी घटनासंदर्भातील पुरावे आणि माहितीची पडताळणी केली. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केज तालुक्यात २० जूनच्या रात्री दोन गटांतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, खरा सूत्रधार समोर आणून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या प्रकरणानंतर केजमध्ये मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून त्यामध्ये दोन गटांमध्ये दगडफेक आणि हाणामारी झाल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनीही घुले कुटुंबीयांची भेट घेत तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “नऊ आरोपींना अटक झाली, मात्र एका आरोपीवर अद्याप कारवाई का झाली नाही? त्याला कोणाचे संरक्षण आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता सौरव सोनवणे यांच्या चौकशीनंतर एसआयटी पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!