दुपारच्या उन्हात झाडाखाली घेतलेला विसावा ठरला अखेरचा; झोपेतच मृत्यूने गाठलं, पुण्याच्या कात्रजमध्ये भीषण घटना

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात निष्काळजी वाहनचालकामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी रस्त्यालगतच्या झाडाच्या सावलीत विसावलेल्या व्यक्तीच्या अंगावर भरधाव कार चढवण्यात आली. या भीषण अपघातात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

या अपघातात विलास मारुती धांडे (वय ४३) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा अरुण विलास धांडे (वय २१, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजता कात्रजमधील शेलार मळा येथील महादेव मंदिराजवळ विलास धांडे हे झाडाच्या सावलीत झोपले होते. त्याचवेळी लाल रंगाची कार भरधाव वेगाने आली आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट त्यांच्या अंगावर गेली.

या भीषण धडकेत विलास धांडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमीला मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना माहिती देण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लाल रंगाच्या कारचा आणि तिच्या चालकाचा शोध सुरू आहे. आरोपीचा लवकरच माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.