खुटबावमध्ये वादाचे रूपांतर मारहाणीत; मजूर गंभीर जखमी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

दौंड : दौंड तालुक्यातील खुटबाव (साळोबावस्ती) येथे किरकोळ कारणावरून एका मजुरावर लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यवत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी यवत पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बाळासाहेब साळवे (वय 26, रा. खुटबाव) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय राजू भांडवलकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बुधवारी (24 जून) सायंकाळी सुमारे पाच वाजता खुटबाव येथील गणपती मंदिराजवळ अमोल साळवे उभे असताना त्यांच्या भाचीने त्यांना आवाज दिला. त्यावेळी ते तेथे गेले असता विजय भांडवलकर रागाने पाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत जाब विचारल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

वादाचे रूपांतर हाणामारीत होताच विजय भांडवलकर याने जवळच पडलेली लाकडी काठी उचलून अमोल साळवे यांच्या हातांवर, पाठीवर आणि छातीवर वार केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साळवे यांना घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 352, 351(2) आणि 351(3) अंतर्गत विजय राजू भांडवलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.