‘ऑपरेशन सिंदूर’चे 6 शूरवीर अखेर जगासमोर; शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या सहा भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. या नावांचा समावेश राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या वेबसाइटवरील ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये करण्यात आला आहे.

त्यांची नावे नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या वॉल-3D वरील 2025 विभागातही कोरण्यात आली आहेत. 6-7 मे 2025 च्या मध्यरात्री, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांविरुद्ध भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या लष्करी कारवाईत हे जवान शहीद झाले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद जवानांची नावे
१. सुभेदार मेजर पवन कुमार – मुख्यालय, १० इन्फंट्री ब्रिगेड
२. रायफलमन सुनील कुमार – ४ थी बटालियन जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री रेजिमेंट
३. लान्स नाईक दिनेश कुमार – ५ वी फील्ड रेजिमेंट
४. अग्निवीर मूड मुरली नायक – ८५१ वी लाइट रेजिमेंट
५. हवालदार सुनील कुमार सिंग – २३७ वी फील्ड वर्कशॉप
६. सार्जंट सुरेंद्र कुमार – ३९ विंग, भारतीय हवाई दल

रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले, तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना वायू पदकाने सन्मानित करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा जवानांची नावे नवी दिल्लीतील इंडिया गेट सर्कल येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकात विशेष ग्रॅनाइट फलकांवर कायमस्वरूपी कोरली जातील.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा शूर जवानांची नावे प्रथमच जाहीर केली आहेत. या सर्व शहीदांसाठी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात एक जागा निश्चित करण्यात आली आहे, जिथे त्यांची नावे विशेष ग्रॅनाइट विटांवर कायमस्वरूपी कोरली जातील. या सहा शहीदांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलाचे एक सार्जंट यांचा समावेश आहे. रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र, तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना एअर मेडल प्रदान करण्यात आले. संरक्षण सूत्रांनुसार, यातील बहुतेक जवान जम्मू आणि काश्मीरमधील मोहिमेदरम्यान शहीद झाले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैबाच्या नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांमध्ये (DGMOs) झालेल्या चर्चेनंतर, दोन्ही देशांनी लष्करी कारवाई थांबवण्यास सहमती दर्शवली. राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन 2019 मध्ये झाले. इंडिया गेटजवळ 2019 मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यापासून देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांची नावे येथे कोरलेली आहेत. या सहा नावांच्या समावेशामुळे, ऑपरेशन सिंदूरला राष्ट्रीय युद्ध स्मारकावर अधिकृतपणे सन्मानित करण्यात आलेल्या लष्करी मोहिमांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर जवळपास शेकडोवेळा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. नवी कोरी विमाने पाडण्यात आली असाही दावा त्यांनी बोलताना केला होता. भारताने ट्रम्प यांच्या वक्तव्यांवर थेट नाव घेऊन खुलासा केला नसल्याने विरोधी पक्षांनी सातत्याने सरकारच्या भूमिकेवरून तोफ डागली आहे.