केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; मुख्यमंत्री फडणवीसांनी मान्य केली कुटुंबीयांची मोठी मागणी

पुणे : लोहगडावरून ढकलून केतन अग्रवाल यांची हत्या केल्याप्रकरणी तपास वेगाने सुरू असून या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला अटक देखील करण्यात आली आहे, तसेच त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

दरम्यान केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज केतनच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती, ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. याबाबत सीएमओकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.
लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले.

या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.’ असं ट्विट महाराष्ट्र सीएमोच्या वतीनं करण्यात आलं आहे.

दरम्यान आता या प्रकरणात पोलिसांनी सियाच्या भावाला देखील चौकशीसाठी बोलावलं आहे. त्याची गेल्या दोन तासांपासून चौकशी सुरू आहे. याबाबत लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी माहिती दिली आहे. ‘सियाचा भाऊ साहिल गोयलला लोणावळा पोलिसांनी जबाब घेण्यासाठी बोलवलं आहे,गेल्या काही तासापासून त्याची चौकशी सुरू असून, जबाब नोंदणी सुरू आहे.
साहिल गोयल आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितत देत आहे. सध्या आरोपीच्या संदर्भात जो तपास आहे तो सुरू आहे, कागदोपत्री पुरावा जमा करण्याचं काम सुरू आहे. अग्रवाल कुटुंबातील सदस्यांनी जे आरोप केले आहेत, त्या दृष्टीने गांभीर्याने तपास सुरू आहे, अशी माहिती यावेळी दिनेश तायडे यांनी दिली आहे.