सोनं-चांदीचे दर कोसळले! तब्बल 4500 रुपयांची घसरण; दागिने खरेदीची ‘सुवर्णसंधी’ सुरू

जळगाव : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 4,500 रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या दरातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दागिने खरेदी करण्याची ही योग्य वेळ असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याचा दर जीएसटीसह सुमारे 1 लाख 44 हजार 200 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर चांदीचा दरही मोठ्या प्रमाणात घसरून 2 लाख 26 हजार 600 रुपयांपर्यंत नोंदवला गेला आहे.
दर घसरल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला होता. मात्र आता दर कमी झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळत आहे.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की सोन्यात गुंतवणूक करावी की नाही. सध्या मात्र दर घसरल्याने बाजारात खरेदीसाठी सकारात्मक वातावरण आहे.

चांदीच्या दरातही तब्बल 10,000 रुपयांची घसरण झाली असून औद्योगिक तसेच वैयक्तिक खरेदीदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. दरम्यान, तज्ज्ञांनी गुंतवणूक करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.