बीड हादरलं! विलास घुले खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; खासदार पुत्राचं नाव समोर आल्याने राजकीय खळबळ!

बीड : बीड जिल्ह्यातील विलास घुले खून प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून या प्रकरणात बीडच्या एका खासदाराच्या पुत्राचे नाव समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना केज तालुक्यात घडली. स्थानिक वादातून सुरू झालेला तणाव वाढत जाऊन या हल्ल्यात रूपांतर झाला आणि त्यातूनच विलास घुले यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी तब्बल 11 तास पोलीस ठाण्याबाहेर मृतदेहासह आंदोलन केले. परिस्थिती गंभीर होत असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नातेवाईकांशी फोनवरून संवाद साधून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींची नावे तपासात समाविष्ट केली असून जबाबात खासदाराच्या पुत्राचा उल्लेख झाल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. फिर्यादीत आरोपींनी धमकी दिल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणात हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा वाद वैयक्तिक कारणांमधून सुरू झाला होता. एका व्यक्तीच्या अनैतिक संबंधांवरून सुरू झालेला वाद वाढत गेला आणि त्यात विलास घुले यांनी हस्तक्षेप केल्याने हा संघर्ष अधिक गंभीर झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील सत्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.