मान्सूनने व्यापला संपूर्ण महाराष्ट्र! विदर्भ-उत्तर महाराष्ट्रात दमदार आगमन; पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

पुणे : संततधार पावसाने पुणेकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिला आहे. शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, दक्षिण-पश्चिम मान्सूनने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उर्वरित भागांमध्येही आगेकूचकरत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मान्सून अधिक सक्रिय झाल्याने पुणे जिल्ह्याच्या घाट विभागासाठी ऑरेंज, तर शहरासह उर्वरित जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सध्या मध्य प्रदेशातील चक्रीय स्थितीपासून पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय रेषा विस्तारलेली आहे. या हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून पुढील काही दिवस अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, शहरात अधिकृतरित्या मान्सून दाखल झाल्यानंतर मंगळवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. रात्रभर सुरू असलेल्या संततधारेमुळे शहरातील रस्ते, उद्याने आणि विविध परिसर ओलाचिंब झाले. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट, तर घाट विभागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाच्या आगमनामुळे शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमानात तब्बल पाच ते सहा अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली. बुधवारी शहराचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर शहरातील काही भागांत हलक्या स्वरूपाच्या सरीही बरसल्या.
पुणे आणि परिसरात गुरुवारी (ता. २५) कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मान्सून आणखी सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.