‘केतन जिवंत आहे…’ पोलिसांकडून माहिती मिळताच सियाला फुटला घाम; मोठा गौप्यस्फोट समोर

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवालला ढकलून दिल्याचा आरोप असलेल्या सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, तपासात अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. दोघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, सगळ्यात आधी घटनास्थळावर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सियाने केतनला गडावरून ढकलून दिलं. तेव्हा तिने आरडाओरडा केला. केतन खाली पडल्याची माहिती तिने इतर पर्यटकांना दिली. याची माहिती जेव्हा गडावरील पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली.

तेव्हा कर्तव्यावर असलेले राहुल नावाचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सिया तिथे घाबरलेल्या अवस्थेत उभी होती, मात्र तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. पोलीस घटनास्थळी येताच तिने केतन फोटो काढताना गडावरून खाली पडल्याचं सांगितलं.

पोलिसांनी जंगलात शोधमोहीम राबवून केतनचा शोध घेतला. सियाने दाखवलेल्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर केतनचा मृतदेह आढळल्याचे सांगितले जाते. मात्र त्या वेळी सियाला प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देण्यात आली नव्हती. तिला रस्त्याजवळ थांबवण्यात आले होते, तर पोलीस जंगलातून बाहेर येत होते. प्रत्येक वेळी ती केतनच्या प्रकृतीबाबत विचारणा करत होती, अशी माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, सियाला मानसिक धक्का बसू नये म्हणून तिला वारंवार केतन जिवंत आहे, तो सुरक्षित आहे, फक्त जखमी झाला आहे असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र केतनचा मृत्यू झाला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे शब्द ऐकल्यानंतर सिया अधिकच अस्वस्थ झाली. तिच्या हालचालींमध्ये भीती आणि तणाव स्पष्टपणे जाणवत होता. ती सतत थरथरत असल्याचेही संबंधित कर्मचाऱ्यांनी निरीक्षण केले.
याच दरम्यान, तिच्या चेहऱ्यावर चिंता वाढल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र त्या वेळी पोलिसांचे लक्ष बचाव आणि शोधकार्यात असल्याने या बाबींकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. सियाच्या वर्तनाबाबतची ही माहिती आता चर्चेचा विषय ठरली आहे.