56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! कर्जमाफीची प्रतिक्षा संपली; लवकरच येणार मेसेज, 2019 च्या लाभार्थ्यांनाही मिळणार दिलासा?

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरी शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून, पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीबाबत संदेश पाठवला जाणार आहे. विधान परिषदेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

राज्य मंत्रिमंडळाने 2 जून 2026 रोजी या योजनेला मंजुरी दिली होती. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाचीही तरतूद करण्यात आली आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू करण्यात आली असून, त्याबाबत बँकांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे थकीत कर्जदार शेतकरी पुन्हा कर्जपात्र होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, कर्जमाफी योजनेचे निकष, अटी आणि शर्ती यामध्ये आवश्यक बदल करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांचा समावेश असलेला मंत्रिगट कार्यरत आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी स्वतंत्र उपसमितीही गठीत करण्यात आली आहे.

याशिवाय, 2019 मधील महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे 12.71 लाख शेतकऱ्यांनाही नव्या कर्जमाफी योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.