केतनला मारण्याआधी सिया अन् चेतनची कॅफेत गुप्त भेट; तिथेच रचला लोहगडावरील ‘फुलप्रूफ’ प्लॅन, समोर आली A to Z स्टोरी

पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या प्रकरणात आता हा मृत्यू नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची ओळख मागील वर्षी दिवाळीदरम्यान एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, सियाचे लग्न केतन अग्रवाल याच्यासोबत ठरले होते. मात्र, तिला हे लग्न नको असल्याने केतनला मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हत्या करण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी एका कॅफेमध्ये भेट घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. लोहगड किल्ल्यावर अशी कोणती जागा आहे, जिथून ढकलल्यास केतन वाचण्याची शक्यता कमी असेल, यावर दोघांनी चर्चा केल्याचा दावा तपासातून समोर आला आहे. त्यानंतर लोहगडावरील ठिकाणाची पाहणी करून कथितपणे संपूर्ण प्लॅन तयार करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

पोलिसांच्या तांत्रिक तपासात सिया आणि चेतन यांच्यातील संपर्काचे तपशीलही उघड झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत दोघांमध्ये तब्बल 2004 फोन कॉल्स झाले होते. या कॉल्समधून सुमारे 238 तास संभाषण झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या संवादांदरम्यानच संपूर्ण कटाची आखणी करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. 14 जून रोजीही सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळीही त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, तो प्रयत्न फसला. त्यानंतर ‘साप आला, साप आला’ असा आरडाओरडा करून घडलेला प्रकार अपघात असल्याचे भासवण्यात आल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे अग्रवाल कुटुंबाला मोठा धक्का बसला असून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे, आरोपींचे जबाब आणि इतर बाबींच्या आधारे सखोल तपास सुरू आहे.