रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! आता धान्य कुटुंबाऐवजी व्यक्तीनिहाय मिळणार..

पुणे : केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा (सुधारणा) विधेयक, २०२६ चा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून रेशन वाटपाच्या पद्धतीत सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

सध्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत (AAY) प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्य दिले जाते. मात्र नव्या प्रस्तावानुसार आता धान्य वितरण कुटुंबाऐवजी लाभार्थ्यांच्या संख्येनुसार केले जाणार आहे. यानुसार प्रत्येक व्यक्तीस दरमहा ७ किलो धान्य देण्याचा विचार करण्यात आला आहे.
तथापि, एका कुटुंबासाठी धान्याची कमाल मर्यादा ३५ किलो कायम ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार धान्याचे वितरण ठरवले जाईल, परंतु एकूण मर्यादा बदलणार नाही.

सरकारच्या मते, सध्याच्या प्रणालीत मोठ्या आणि लहान कुटुंबांमध्ये असमानता निर्माण होते. काही ठिकाणी लहान कुटुंबांना जास्त लाभ मिळतो, तर मोठ्या कुटुंबांना तुलनेने कमी धान्य मिळते. ही तफावत दूर करून सर्व लाभार्थ्यांना समान आणि न्याय्य लाभ मिळावा हा या बदलाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रस्तावामुळे रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि संतुलित होईल, तसेच गरजू मोठ्या कुटुंबांना याचा अधिक फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे.
या मसुद्यावर नागरिक, तज्ज्ञ आणि इतर हितधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. १३ जुलै २०२६ पर्यंत सूचना आणि आक्षेप सादर करता येणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
जर ही सुधारणा लागू झाली, तर देशातील शिधावाटप प्रणालीतील हा एक मोठा आणि ऐतिहासिक बदल मानला जाईल.