लग्नास नकार दिल्याने संताप! AI डीपफेक फोटो, 500 कॅब बुकिंग, बनावट निमंत्रण पत्रिका; तरुणीचा धक्कादायक आरोप

पुणे : एका तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर आरोपी तरुणाने तिचा सतत मानसिक आणि डिजिटल छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा त्रास एका वर्षाहून अधिक काळ सुरू असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

माहितीनुसार, दोघांची ओळख विवाह संकेतस्थळावरून झाली होती. काही काळातच दोन्ही कुटुंबांची भेट झाली, मात्र तरुणाचे वर्तन संशयास्पद वाटल्याने नाते पुढे नेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर आरोपीने तरुणीला वारंवार फोन व मेसेज करून त्रास देण्यास सुरुवात केली. जुलै 2025 मध्ये त्याचा नंबर ब्लॉक करण्यात आला, तरीही तो वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क साधत राहिला.
आरोपानुसार, आरोपीने तरुणी व तिच्या कुटुंबावर दबाव आणण्यासाठी अनेक प्रकारचे छळ केले. त्याने ऑनलाइन कॅब सेवा (Ola, Uber, Rapido) वापरून तिच्या घराच्या पत्त्यावर एकाच दिवसात सुमारे 500 कॅब व बाईक बुक केल्याचा प्रकार घडवला. या अनपेक्षित बुकिंगमुळे कुटुंबीय आणि चालक दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.

तसेच आरोपीने दुसऱ्या व्यक्तीचा फोटो वापरून बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार केले. या प्रोफाइलद्वारे तो तरुणीच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. नंतर ते प्रोफाइल हटवण्यात आले.

याशिवाय, तरुणीच्या डोहाळेजेवणासाठी बनावट निमंत्रण पत्रिका तयार करून त्यावर आकर्षक ऑफर्सचा उल्लेख करत ती परिसरात वाटण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि तिच्या कुटुंबाला मानसिक त्रास झाला.
प्रकरण आणखी गंभीर होत आरोपीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून तरुणीचे खोटे विवाह व हनिमूनचे डीपफेक फोटो तयार केल्याचा आरोप आहे. हे फोटो सोशल मीडिया व मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आले.
पीडित तरुणीने हे प्रकरण महिला आयोगाकडे नेले असून तिने औपचारिक तक्रार दाखल केली आहे. आयोगासमोर तिने आपला जबाब नोंदवून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे AI डीपफेक तयार करणे, ऑनलाइन छळ करणे आणि बनावट बुकिंगद्वारे त्रास देणे हे गंभीर गुन्हे आहेत. भारतीय कायद्यानुसार IT Act आणि संबंधित कलमांखाली कारवाई होऊ शकते.
या घटनेमुळे डिजिटल छळ, AI गैरवापर आणि ऑनलाइन सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.