लग्नाला फक्त 24 तास; घरासमोर कार दिसताच नवरी पळत सुटली, पुढे उघड झालेलं सत्य पाहून नवरदेव हादरला


जुन्नर : लग्नानंतर अवघ्या 24 तासांत नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अजय भीमराव रोहोम (रा. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आळेफाटा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय रोहोम यांच्या लग्नासाठी कुटुंबीयांनी मध्यस्थामार्फत जुन्नरमधील आळे येथील एजंट संगीता शिंदे हिच्याशी संपर्क साधला होता. संगीताने अजयला एक मुलगी दाखवली आणि लग्नाचा खर्च तसेच एजन्सीचे कमिशन म्हणून 1 लाख 60 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर 20 जून रोजी अजय आणि राधा रमेश कांबळे यांचा विवाह लावून देण्यात आला.

लग्नानंतर दुसऱ्या दिवशी अजय आपल्या नव्या नवरीला घेऊन घरी आला. घरात आनंदाचे वातावरण असतानाच संध्याकाळी त्यांच्या घराबाहेर काळ्या काचा असलेली पांढऱ्या रंगाची एक संशयास्पद कार येऊन थांबली. कार पाहताच नवरी राधा कोणालाही काही न सांगता थेट त्या दिशेने धावत गेली आणि गाडीत बसण्याचा प्रयत्न करू लागली.

हा प्रकार लक्षात येताच अजय आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तिला अडवले. दरम्यान, घटनास्थळी लोकांची गर्दी जमल्याचे पाहून संबंधित कार तेथून निघून गेली. त्यानंतर नवरीकडे करण्यात आलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, ती कार तिला घेण्यासाठीच आली होती. लग्नासाठी घेण्यात आलेल्या 1 लाख 60 हजार रुपयांमधील स्वतःचा ठरलेला हिस्सा घेण्यासाठी ती आळेफाटा येथे जाणार होती. त्यानंतर तेथून जालना येथे परत जाण्याचा तिचा बेत होता, असे समोर आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजय रोहोम यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी राधा रमेश कांबळे (रा. जालना), संगीता शिंदे (रा. आळे, जुन्नर), अमोल पिंजारी (रा. श्रीरामपूर) आणि सोनाली भोसले (रा. परवडी, जालना) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत असून, संबंधित टोळीने अशाच प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!