1 जुलैपासून बदलणार तुमच्या खिशाचं गणित! आधार, रेल्वे आणि गॅस सिलिंडरबाबत मोठे निर्णय

नवी दिल्ली : 1 जुलैपासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय बदल लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर, प्रवासावर आणि घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे. आधार कार्ड अपडेटपासून ते रेल्वे प्रवासातील दंड आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांपर्यंत अनेक बदल लागू होणार आहेत.

आधारमधील ई-मेल अपडेट मोफत
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी जोडणे किंवा त्यात बदल करणे पूर्णपणे मोफत असणार आहे. याआधी या सेवेसाठी 75 रुपये शुल्क आकारले जात होते. नागरिकांना अधिकृत आधार मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या ही सुविधा वापरता येणार आहे.

विनातिकीट प्रवासावर दुप्पट दंड
1 जुलैपासून रेल्वे प्रशासनही अधिक कठोर भूमिका घेणार आहे. वैध तिकीट किंवा पासशिवाय प्रवास करणाऱ्यांसाठी किमान दंड 250 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आला आहे. तसेच रेल्वेत धोकादायक वस्तूंची वाहतूक केल्यास किमान 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. परवानगीशिवाय फेरीवाला व्यवसाय करणे किंवा भीक मागणे यासाठीही 2 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये बदलाची शक्यता
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या दरांचे पुनरावलोकन केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक घडामोडींचा परिणाम गॅसच्या दरांवर होऊ शकतो. त्यामुळे 1 जुलै रोजी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बँकिंग आणि क्रेडिट कार्ड नियमही बदलणार
याशिवाय काही बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर आणि विविध क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्ससंबंधी नियमांमध्येही बदल होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आर्थिक व्यवहारांचे नियोजन करताना नव्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक ठरणार आहे.