FDA मधील धडाकेबाज कारवायांदरम्यान तुकाराम मुंढेंना मोठा झटका? परभणीच्या पालक सचिवपदावरून हटवण्याचा निर्णय

मुंबई : राज्यात भेसळखोरांविरोधात आक्रमक मोहीम राबवून चर्चेत आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून राज्यभरात धाडसत्र सुरू ठेवणाऱ्या मुंढे यांच्याकडून परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश जारी केल्याने प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

तुकाराम मुंढे यांची फेब्रुवारी 2026 मध्ये परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी ते दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. मात्र नंतर त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार आता परभणीच्या पालक सचिवपदाचा कार्यभार ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांत FDA आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि नियमबाह्य उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. अनेक ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्यांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत असताना व्यापारी आणि भेसळखोरांमध्ये मात्र खळबळ उडाली होती.

दरम्यान, परभणीच्या पालक सचिवपदावरील बदल हा नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कारण पालक सचिव म्हणून काम करणारे अधिकारी संबंधित विभागातील सचिव दर्जाचे असणे आवश्यक मानले जाते. मुंढे सध्या आयुक्त पदावर कार्यरत असल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

याच आदेशात अकोला जिल्ह्याच्या पालक सचिवपदातही बदल करण्यात आला असून, परिमल सिंह यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
**पालक सचिवाचे महत्त्व काय?**
पालक सचिव हा राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानला जातो. शासनाच्या योजना, विकासकामे आणि विविध प्रकल्पांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. जिल्ह्याचा नियमित दौरा करून विकासकामांचा आढावा घेणे, अडचणी सोडवण्यासाठी उपाय सुचवणे आणि शासनाला अहवाल सादर करणे हे पालक सचिवांचे प्रमुख काम असते.
परभणीतील या बदलामुळे प्रशासकीय पातळीवर नव्या चर्चांना सुरुवात झाली असली तरी तुकाराम मुंढे यांचा FDA मधील धडाकेबाज कारवाईचा वेग कायम राहणार असल्याचे संकेत प्रशासनातील सूत्रांकडून दिले जात आहेत.