दौंड-पुणे मार्गावर इलेक्ट्रिक लोकल सुरू करा; खासदार पार्थ पवारांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी..

दौंड : दौंड-पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक ठरू शकणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्यसभेचे खासदार पार्थ अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दौंड-पुणे-दौंड दरम्यान इलेक्ट्रिक लोकल (ईएमयू) सेवा प्राधान्याने सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेल्वेमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.

निवेदनात पार्थ पवार यांनी नमूद केले आहे की, दौंड-पुणे-दौंड मार्गावर आवश्यक रेल्वे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू करण्यास कोणतीही अडचण नसून, वाढत्या प्रवासीसंख्येचा विचार करता ही सेवा तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.
दौंड-पुणे-दौंड दरम्यान दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि औद्योगिक कामगार प्रवास करतात. त्यांच्यासाठी रेल्वे ही अत्यावश्यक वाहतूक सेवा बनली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या डिझेल मल्टिपल युनिट (डेमू) आणि डिझेल इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट (डीईएमयू) गाड्यांची क्षमता अपुरी पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

दौंड, पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी बुद्रुक आणि हडपसर येथून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीत प्रवास करावा लागतो. अनेकदा अंग चोरून उभे राहून प्रवास करण्याची वेळ येते. विशेषतः महिला प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांकडून या समस्येकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, दौंड-पुणे-दौंड मार्गावरील रेल्वे सेवांमध्ये होणारा विलंब, अनियमित वेळापत्रक आणि वाढती गर्दी यामुळे दररोजच्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे डेमू आणि डीईएमयू सेवांचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही पार्थ पवार यांनी केली आहे.
या भागात झपाट्याने होणारे शहरीकरण आणि दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता दौंड-पुणे दरम्यान इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू करण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच रेल्वेसंबंधित प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत मार्गी लावण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पार्थ पवार यांच्या दौंड रेल्वे जंक्शनसंदर्भातील प्रमुख मागण्या
दौंड जंक्शन स्थानकासाठी मंजूर विकास आराखड्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात यावा.
दौंड जंक्शनवरील प्रवासी सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात यावे.
स्थानकावरील पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास करण्यात यावा.
वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून भविष्यातील नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात यावी.
रेल्वेच्या जागेत ‘नमो उद्यान’ उभारण्यासंदर्भातील दौंड नगरपालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी.
दौंड-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना पार्थ पवार यांनी आवाज दिल्याने इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू होण्याबाबत आशा निर्माण झाली आहे. आता रेल्वे मंत्रालय या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.