आधी 6 खासदार फुटले, आता बैठकीला 4 आमदारांचीही दांडी; ठाकरे गटात पुन्हा खळबळ..

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षात आणखी फूट पडू नये आणि आमदारांमध्ये एकजूट कायम राहावी यासाठी त्यांनी मुंबईतील ‘शिवालय’ येथे आमदारांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीला चार आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक विषय तसेच विधिमंडळातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 17 आमदार उपस्थित होते, तर विधान परिषदेच्या 6 आमदारांपैकी 5 आमदारांनी बैठकीला हजेरी लावली.
सहा खासदारांच्या निर्णयानंतर हालचालींना वेग
ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विकासकामांसाठी निधीची गरज आणि मतदारसंघातील अडचणींचा उल्लेख करत या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षातील उर्वरित आमदारांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तातडीने आमदारांची बैठक घेऊन पक्ष संघटना मजबूत ठेवण्यावर भर दिल्याचे सांगितले जात आहे.

‘या’ चार आमदारांची अनुपस्थिती चर्चेत
महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांमध्ये संजय पोतनीस, राहुल पाटील, संजय देरकर,, सुनील शिंदे, यांचा समावेश आहे.
या चार आमदारांच्या अनुपस्थितीमुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यांनी बैठकीला गैरहजर राहण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ठाकरे गटात आणखी उलथापालथ?
सहा खासदारांच्या बंडानंतर लगेचच बोलावलेल्या बैठकीला काही आमदार अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गटात आणखी काही घडामोडी होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, आगामी काळात ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असेल आणि या घडामोडींनंतर पक्ष संघटनेवर काय परिणाम होईल, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.