NEET UG 2026 पुनर्परीक्षेआधी टेलिग्रामवर निर्बंध; पेपर लीक, फेक चॅनेल आणि एडिट फीचरमुळे सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : NEET UG 2026 पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर तात्पुरते निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. कथित पेपर लीक, बनावट प्रश्नपत्रिकांची विक्री आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या संदेशांच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती, मात्र ती फेटाळण्यात आल्याची माहिती आहे.

NTA च्या माहितीनुसार, टेलिग्रामवर “Paper Leak NEET”, “Re-NEET 2026” आणि इतर नावांची अनेक चॅनेल सक्रिय होती. या चॅनेलवर कथित प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा केला जात होता. काही ठिकाणी विद्यार्थ्यांकडून हजारो ते लाखो रुपये उकळण्याचे प्रकारही समोर आले. पैसे घेतल्यानंतर बनावट PDF किंवा चुकीची माहिती देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
व्हॉट्सअॅपऐवजी टेलिग्रामवरच कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तज्ज्ञांच्या मते, टेलिग्रामवर लाखो सदस्य असलेली सार्वजनिक चॅनेल सहज तयार करता येतात. तसेच 2 GB पर्यंतच्या फाइल्स शेअर करण्याची सुविधा असल्याने कथित प्रश्नपत्रिका, PDF आणि इतर सामग्री मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली जाऊ शकते.
टेलिग्रामचे मेसेज एडिट फीचरही चर्चेत आले आहे. काही प्रकरणांमध्ये जुने संदेश संपादित करून त्यांना पेपर लीकचा पुरावा असल्याप्रमाणे सादर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या सुविधेवरही तात्पुरत्या मर्यादा आणण्यात आल्याची चर्चा आहे.


Your message has been sent
दुसरीकडे, व्हॉट्सअॅपमध्ये सार्वजनिक चॅनेलची व्याप्ती मर्यादित असून संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गैरप्रकारांवर तुलनेने जलद नियंत्रण मिळवणे शक्य होते.
दरम्यान, सरकारने स्पष्ट केले आहे की हा निर्णय कायमस्वरूपी नाही. NEET UG 2026 पुनर्परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी तसेच विद्यार्थ्यांना अफवा आणि फसवणुकीपासून वाचवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांवरच अवलंबून राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.