बँक ग्राहकांसाठी मोठा अलर्ट! पुढील आठवड्यात चार दिवस बँका बंद, व्यवहार आधीच पूर्ण करा

पुणे : पुढील आठवडा बँकिंग व्यवहारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण 22 जून ते 28 जून 2026 दरम्यान देशातील विविध राज्यांमध्ये एकूण चार दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीनुसार राष्ट्रीय, प्रादेशिक आणि धार्मिक कारणांमुळे या सुट्ट्या लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुसरा शनिवार, चौथा शनिवार तसेच रविवार यांचा समावेश असल्याने बँक शाखांमधील कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे.

22 जून रोजी रथयात्रा निमित्त ओडिशा, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये बँका बंद राहतील. या दिवशी संबंधित राज्यांमध्ये बँकिंग सेवा उपलब्ध नसतील. 25 जून रोजी मोहरमच्या निमित्ताने आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे बँका बंद राहतील. 26 जून रोजी मोहरम/आशुरा निमित्त देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये बँका बंद राहतील. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळूर, पाटणा, जयपूर आणि भोपाळ यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
27 जून रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने सर्व सार्वजनिक आणि खासगी बँका देशभर बंद राहतील, तर 28 जून रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल. त्यामुळे सलग तीन दिवस अनेक राज्यांमध्ये बँक व्यवहार ठप्प राहण्याची शक्यता आहे.

विशेषतः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये 26 ते 28 जूनदरम्यान सलग तीन दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार, ड्राफ्ट प्रोसेसिंग आणि इतर महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, बँक शाखा बंद असल्या तरी ग्राहकांसाठी डिजिटल सेवा पूर्णपणे कार्यरत राहणार आहेत. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI (Google Pay, PhonePe, Paytm) आणि ATM सेवा 24 तास सुरू राहतील. त्यामुळे ग्राहकांना डिजिटल माध्यमातून व्यवहार सुरू ठेवता येणार आहेत.