चोरट्यांनी १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ४०० किलो तांबे नेले चोरुन 


लोणी काळभोर, ता. २० : येथील तिर्थक्षेत्र रामदरा रोडवरील हिलबी बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या आवारातील महावितरणच्या ६३० केव्हीए क्षमतेच्या विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सुमारे ४०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरुन नेल्या आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी कंपनीचे वरिष्ठ लेखापाल अंकुश रामचंद्र शिंदे (वय ६२, रा. ड्रीम्स नंदिनी सोसायटी, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. कंपनीचे उत्पादन अद्याप सुरू झाले नाही तरी वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून ६३० केव्हीए क्षमतेचा रोहित्र येथे बसविण्यात आले आहे.

६ जून रोजी दुपारी जेवणाच्या वेळी अंकुश शिंदे यांनी कार्यालयाच्या खिडकीतून बाहेर पाहिले असता रोहित्राजवळ काही संशयास्पद हालचाल झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रोहित्राचे नट-बोल्ट काढून त्याची प्लेट उघडण्यात आली होती. तसेच ऑइल बाहेर सोडून आतमधील तांब्याच्या तारा चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी रोहित्राचे काही पत्रे आणि सुटे भागही परिसरात टाकून दिले होते. याबाबत कंपनीचे संचालक विशाल भागवत यांना माहिती देण्यात आली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र चोरीस गेलेले तांबे मिळून आले नाही.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ५ जून रोजी रात्री ११.४० ते ६ जून रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गेट क्रमांक २ जवळील सिमेंटच्या कट्ट्यावर बसविण्यात आलेल्या रोहित्रातील सुमारे ४०० किलो वजनाचे तांबे लंपास केले. चोरीस गेलेल्या तांब्याची किंमत अंदाजे १ लाख ८० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश कोल्हे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!