फोनपे वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! नवा नियम जाणून घ्या, अन्यथा कट होऊ शकतात पैसे..

मुंबई : डिजिटल व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मोबाईल वॉलेट आणि यूपीआयचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना फोनपे ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या नियमामुळे दीर्घकाळ डिजिटल पाकीट वापरत नसलेल्या ग्राहकांच्या खिशाला फटका बसू शकतो.

कंपनीने स्पष्ट केले आहे की, फोनपेचे डिजिटल पाकीट तयार करून ते दीर्घकाळ वापरात न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून आता ‘निष्क्रिय वॉलेट देखभाल शुल्क’ आकारले जाणार आहे. डिजिटल पाकिटाची देखभाल आणि सेवा सुरू ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
PhonePe च्या माहितीनुसार, एखाद्या ग्राहकाने सलग 365 दिवस डिजिटल पाकिटातून कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही, तर ते वॉलेट निष्क्रिय मानले जाईल. केवळ अॅप उघडणे, शिल्लक रक्कम तपासणे किंवा यूपीआयद्वारे पेमेंट करणे याचा वॉलेट व्यवहारांमध्ये समावेश होणार नाही. डिजिटल पाकिटातील शिल्लक रक्कम वापरणे, पैसे पाठवणे किंवा वॉलेटद्वारे थेट पेमेंट करणे आवश्यक असेल.

नव्या नियमानुसार, वॉलेट सलग एक वर्ष निष्क्रिय राहिल्यास कंपनी दर तीन महिन्यांनी 100 रुपये (जीएसटीसह) देखभाल शुल्क आकारणार आहे. वॉलेटमध्ये 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास हे शुल्क थेट वजा केले जाईल. तर शिल्लक रक्कम 100 रुपयांपेक्षा कमी असल्यास उपलब्ध रक्कमच कापली जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत वॉलेटमध्ये निगेटिव्ह शिल्लक निर्माण होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, शुल्क आकारण्यापूर्वी ग्राहकांना सूचना किंवा संदेशाद्वारे पूर्वकल्पना दिली जाणार आहे. सूचना मिळाल्यानंतरही वॉलेटचा वापर झाला नाही, तरच हे शुल्क आकारले जाईल.
दरम्यान, या शुल्कापासून बचाव करणे अत्यंत सोपे आहे. ग्राहकांनी वर्षातून किमान एकदा डिजिटल पाकिटातून छोटासा व्यवहार केला, तरी वॉलेट सक्रिय राहील आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे वॉलेटमध्ये पैसे ठेवून विसरणाऱ्या ग्राहकांनी वेळोवेळी खाते तपासणे आणि लहान व्यवहार करून ते सक्रिय ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर PhonePe च्या या निर्णयाची चर्चा सुरू झाली असून, लाखो वापरकर्त्यांनी आता आपल्या डिजिटल पाकिटांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.