साईभक्तांसाठी मोठी खुशखबर! पुणे-शिर्डी एक्स्प्रेस सुरू; ‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर मिळणार थांबा


पुणे : पुणे आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या साईभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे–साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज अधिकृतपणे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानावरून ऑनलाइन उपस्थिती लावत कार्यक्रमात सहभाग घेतला, तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे रेल्वे स्थानकावरून गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

या वेळी केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे रेल्वेच्या विकासासाठी हडपसर, शिवाजीनगर, खडकी, उरुळी आणि आळंदी परिसरात विविध प्रकल्प राबवले जात असल्याची माहिती दिली. पुणे जंक्शनचे आधुनिकीकरण, अतिरिक्त प्लॅटफॉर्म, आकुर्डी येथे मेगा कोचिंग टर्मिनल आणि अत्याधुनिक डिजिटल सिग्नलिंगमुळे पुढील काही वर्षांत पुणे रेल्वेची क्षमता दुप्पट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे हे शिक्षण, आयटी आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे या नव्या रेल्वे सेवेमुळे साईभक्तांना अधिक सुरक्षित, किफायतशीर आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि समूहाने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा विशेष लाभदायक ठरणार आहे.

तसेच अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना पुण्यातील शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. याशिवाय शिर्डीतील पर्यटन, हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा आणि स्थानिक व्यापारालाही या रेल्वे सेवेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

पुणे–साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला दौंड कॉर्ड केबिन, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार आणि संशोधकांच्या प्रवासाला मोठी सुविधा मिळणार आहे. तसेच शनि शिंगणापूर परिसरातील धार्मिक पर्यटनालाही यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!