‘नॉट रिचेबल’च्या चर्चांना मातोश्रीवरून जोरदार उत्तर! उद्धव ठाकरेंच्या बैठकीत सर्व ९ खासदारांची हजेरी; प्रत्यक्ष कोण आले, कोण जोडले ऑनलाईन?

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटणार, काही खासदार संपर्काबाहेर आहेत, पक्षात मोठी राजकीय घडामोड होणार अशा चर्चांनी गेल्या काही दिवसांत जोर धरला होता. विशेषतः सत्ताधारी गटाकडून सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या विविध राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर झालेल्या खासदारांच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र या बैठकीनंतर ठाकरे गटाने एकजुटीचे प्रदर्शन करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री निवासस्थानी लोकसभा खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. बैठकीपूर्वी काही खासदार गैरहजर राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काहींच्या नावाभोवती तर ‘संपर्काबाहेर’ असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सर्व नऊ खासदार बैठकीत सहभागी झाल्याचा दावा केला.
मातोश्रीवर प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई, नाशिकचे राजाभाऊ वाजे आणि ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील यांचा समावेश होता. याशिवाय संजय राऊत स्वतः बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, पाच खासदारांनी विविध वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्याने ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतला. शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नीची प्रकृती बिघडल्याने ते मुंबईत येऊ शकले नाहीत. धाराशिवचे ओमराजे निंबाळकर हे आपल्या आजारी मुलासोबत पुण्यातील रुग्णालयात असल्याने त्यांनी तेथूनच सहभाग नोंदवला. यवतमाळचे संजय देशमुख हे मुलीच्या आगामी विवाह सोहळ्याच्या तयारीत व्यस्त होते. हिंगोलीचे नागेश पाटील-आष्टीकर हे मतदारसंघातील राजकीय कार्यक्रमांमुळे अडकले होते, तर परभणीचे संजय जाधव यांनी पूर्वनियोजित कौटुंबिक कार्यक्रमामुळे दूरध्वनीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

बैठकीत आगामी राजकीय परिस्थिती, संघटनात्मक बांधणी, लोकसभा मतदारसंघांतील कामकाज, पक्षविस्तार आणि पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काळातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पक्षाने अधिक सज्ज राहण्यावर भर देण्यात आल्याचेही समजते.
बैठकीनंतर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाचे सर्व खासदार उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे आहेत. दर महिन्याला अशा बैठका होत असतात आणि त्यातून खासदारांना मार्गदर्शन केले जाते. आज प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेले खासदार पुढील काही दिवसांत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना आणि पक्षफुटीच्या चर्चांना उधाण आलेल्या काळात झालेल्या या बैठकीने ठाकरे गटाने एकजुटीचा ठोस संदेश दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.