रोहित पवारांची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

पंढरपूर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी रोहित पवार यांच्या प्रकृतीत चढ-उतार दिसून येत असून त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे आढळून आले.
तपासणीत रोहित पवार यांची शुगर पातळी 83 पर्यंत खाली आल्याचे समोर आले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, त्यांचा रक्तदाब सध्या नियंत्रणात असून चिंताजनक स्थिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून शरीरातील पाणी आणि साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी ओआरएस घेण्यास तसेच आवश्यक असल्यास सलाईन लावण्याची सूचना केली आहे.

मात्र, प्रकृती खालावली असतानाही रोहित पवार आंदोलनावर ठाम आहेत. “आम्हीही जिद्दी आहोत. कर्जमाफीतील जाचक अटी हटवून सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.