विठ्ठल भक्तांसाठी मोठी अपडेट! 22 ते 24 जूनदरम्यान पंढरपूर विठ्ठल मंदिर बंद; मूर्ती संवर्धनासाठी लेपन प्रक्रिया सुरू


पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार करणाऱ्या भाविकांसाठी मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 22 ते 24 जून या कालावधीत विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी लेपन प्रक्रिया करण्यात येणार असून 23 आणि 24 जून रोजी मंदिर पूर्णपणे दर्शनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे देशभरातील वारकरी आणि भाविकांनी या दोन दिवसांत पंढरपूरकडे प्रवास करू नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

झिजत चाललेल्या विठ्ठल मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे. मूर्तीच्या पायाला पडलेला खड्डा आणि इतर भागांतील नैसर्गिक झीज लक्षात घेऊन संरक्षक लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दगडाची पावडर आणि विशेष ऑरगॅनिक रसायन यांचे मिश्रण वापरले जाणार आहे.

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक स्वरूपाची असल्याने मंदिर पूर्णपणे बंद ठेवणे आवश्यक आहे. मूर्तीच्या पावित्र्याचे आणि सुरक्षिततेचे रक्षण व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्येही अशा प्रकारचे संवर्धन करण्यात आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वारकरी संप्रदाय, मंदिर समिती आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात सखोल चर्चा झाली होती. मूर्ती संवर्धनासाठी पारंपरिक की रासायनिक पद्धत यावर मतभेद असले तरी अखेर रासायनिक पद्धतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

22 ते 24 जूनदरम्यान ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असून 23 व 24 जून रोजी मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद राहतील. त्यामुळे या काळात पंढरपूरला येणाऱ्या भाविकांनी आपले नियोजन बदलावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.

ही संवर्धन प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर विभाग तसेच राज्य पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली होणार आहे. मूर्तीचे आयुष्य वाढावे आणि पुढील पिढ्यांसाठी तिचे जतन व्हावे, हा या कामामागचा मुख्य उद्देश आहे.

दरम्यान, या घोषणेनंतर वारकरी भाविकांमध्ये चर्चेला उधाण आले असून पुढील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!