30 जूननंतर वाहनधारकांची अडचण वाढणार! HSRP नंबर प्लेट नसल्यास दंडासह अनेक RTO सेवा होणार बंद

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले असून यासाठी 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून अनेक महत्त्वाच्या आरटीओ सेवांवरही निर्बंध येणार आहेत.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम मुदतीनंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर 1 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. याशिवाय वाहनांशी संबंधित विविध प्रशासकीय सेवा तातडीने रोखण्यात येतील.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार देशातील सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. वाहनांची ओळख पटविणे, चोरी रोखणे आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, 30 जूनपर्यंत नंबर प्लेट बसवली नाही तर वाहन हस्तांतरण, वाहनावरील कर्जबोजा नोंदविणे किंवा हटविणे, पुनर्नोंदणी, वाहनातील संरचनात्मक बदलांची मंजुरी, परवाना नूतनीकरण यासारखी महत्त्वाची कामे करता येणार नाहीत. केवळ काही आवश्यक प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणाला मर्यादित परवानगी दिली जाऊ शकते.

दरम्यान, अंतिम मुदत जवळ आल्याने वाहनधारकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर HSRP बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. नियमांचे पालन न केल्यास आर्थिक फटका बसण्यासोबतच वाहनासंबंधित कामांमध्येही मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.