खेळताना तोंडात टाकलेला शेंगदाणा थेट फुफ्फुसात; तीन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात, डॉक्टरांनी अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर दिले जीवनदान

नागपूर : लहान मुलांकडे क्षणभर दुर्लक्षही किती महागात पडू शकते, याचे जिवंत उदाहरण नागपुरात समोर आले आहे. खेळता-खेळता तोंडात टाकलेला एक शेंगदाणा थेट तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या फुफ्फुसात जाऊन अडकला. सुरुवातीला हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. मात्र त्यानंतर मुलाला वारंवार ताप येऊ लागला आणि प्रकृती खालावत गेली. अखेर डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे आणि अडीच तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे त्या चिमुकल्याचे प्राण वाचले.

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हा मुलगा घरात खेळत असताना त्याने शेंगदाणा खाल्ला होता. त्या वेळी कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नव्हती. त्यामुळे पालकांनाही कोणताही संशय आला नाही. मात्र काही दिवसांनी मुलाला सतत ताप येऊ लागला. सुरुवातीला सामान्य संसर्ग किंवा हंगामी आजार असावा, असे समजून उपचार सुरू करण्यात आले.
ताप कमी होत नसल्याने आणि मुलगा वारंवार आजारी पडत असल्याने कुटुंबीयांनी त्याला नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सुरुवातीच्या तपासणीत निमोनियाचा संशय व्यक्त केला. त्यानुसार उपचारही सुरू करण्यात आले. मात्र अनेक दिवस उपचार करूनही मुलाच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी अधिक सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

एक्स-रे आणि सीटी स्कॅन करण्यात आल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले. मुलाच्या उजव्या श्वसननलिकेत काहीतरी बाहेरील वस्तू अडकलेली असल्याचे निदर्शनास आले. या अडथळ्यामुळे उजव्या फुफ्फुसाचे कार्य गंभीरपणे बाधित झाले होते. फुफ्फुसात हवा व्यवस्थित पोहोचत नसल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.

डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. अवघ्या तीन वर्षांच्या बालकावर शस्त्रक्रिया करायची होती. श्वसनमार्ग अतिशय अरुंद असल्याने भूल देणे आणि उपकरणांच्या मदतीने अडकलेली वस्तू बाहेर काढणे अत्यंत जोखमीचे होते. थोडीशी चूक झाली असती तर बालकाचा जीव धोक्यात येऊ शकला असता.
विशेष वैद्यकीय पथकाने फायबर ऑप्टिक ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून अडकलेल्या वस्तूचे अचूक स्थान शोधले. त्यानंतर रिजिड ब्रॉन्कोस्कोपी तंत्राचा वापर करून ती वस्तू बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जवळपास अडीच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना यश मिळाले. मुलाच्या फुफ्फुसात अडकलेली वस्तू शेंगदाणा असल्याचे स्पष्ट झाले.
शेंगदाणा बाहेर काढताच मुलाचा श्वास सुरळीत होऊ लागला. काही वेळानंतर त्याला शुद्ध आली आणि प्रकृतीत झपाट्याने सुधारणा दिसून आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास टाकला, तर मुलाच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.
या घटनेनंतर डॉक्टरांनी पालकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. लहान मुलांच्या हातात शेंगदाणे, सुकेमेवे, नाणी किंवा इतर लहान वस्तू देताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अशा वस्तू चुकून श्वसनमार्गात गेल्यास जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. वेळेवर निदान आणि योग्य उपचार झाल्यामुळे या चिमुकल्याचा जीव वाचला, अन्यथा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकले असते.