पुणे जिल्ह्यातील 83 हजार शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ; 21 हजार शेतकऱ्यांना अंशतः कर्जमाफीचा लाभ


पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’मुळे पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 3 लाख 15 हजार 569 शेतकऱ्यांना तब्बल 2 हजार 102 कोटी 90 लाख रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संभाजी होळकर तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे उपस्थित होते.

राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीककर्ज किंवा पुनर्गठित मध्यम मुदतीचे कर्ज, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेले असल्यास त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

83 हजार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ

योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 83 हजार 376 शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण पीककर्ज माफ होणार आहे. यासाठी 749 कोटी 14 लाख रुपये खर्च होणार आहेत.

तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या 21 हजार 299 शेतकऱ्यांना अंशतः कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी उर्वरित रकमेचा भरणा केल्यास त्यांच्या 751 कोटी 2 लाख रुपयांच्या पीककर्जाला दिलासा मिळणार आहे.

याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या 2 लाख 10 हजार 894 शेतकऱ्यांना 927 कोटी 79 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

प्रोत्साहनपर अनुदान कोणाला मिळणार?

सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीककर्ज घेतलेले असणे आणि त्या कर्जाची मुदतीत परतफेड केलेली असणे आवश्यक आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

मात्र, या शेतकऱ्यांनी सन 2025-26 आणि 2026-27 या दोन्ही आर्थिक वर्षांत पीककर्ज घेतले असल्यास त्याचीही मुदतीत परतफेड करणे बंधनकारक राहणार आहे.

कर्जमाफीचा लाभ मिळणारे गटनिहाय शेतकरी आणि रक्कम

दोन लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण पीककर्ज माफ – 83,376 शेतकरी – 749.14 कोटी रुपये
अंशतः कर्जमाफी – 21,299 शेतकरी – 425.98 कोटी रुपये
प्रोत्साहनपर अनुदान – 2,10,894 शेतकरी – 927.79 कोटी रुपये
एकूण लाभार्थी – 3,15,569 शेतकरी – 2,102.90 कोटी रुपये

तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी आणि कर्जमाफी रक्कम

आंबेगाव – 23,753 शेतकरी – 110.88 कोटी रुपये
बारामती – 33,175 शेतकरी – 242.71 कोटी रुपये
भोर – 17,173 शेतकरी – 100.75 कोटी रुपये
दौंड – 38,495 शेतकरी – 344.62 कोटी रुपये
हवेली – 10,601 शेतकरी – 77.68 कोटी रुपये
इंदापूर – 36,495 शेतकरी – 365.05 कोटी रुपये
जुन्नर – 37,578 शेतकरी – 192.46 कोटी रुपये
खेड (राजगुरुनगर) – 37,180 शेतकरी – 172.25 कोटी रुपये
मावळ – 9,590 शेतकरी – 56.20 कोटी रुपये
मुळशी – 5,722 शेतकरी – 27.95 कोटी रुपये
पुरंदर – 25,034 शेतकरी – 147.36 कोटी रुपये
शिरूर – 37,530 शेतकरी – 248.77 कोटी रुपये
वेल्हे – 3,243 शेतकरी – 16.02 कोटी रुपये

इंदापूर तालुक्याला सर्वाधिक फायदा

या कर्जमाफी योजनेचा सर्वाधिक लाभ कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर तालुक्याला होणार आहे. इंदापूरमधील 36 हजार 495 शेतकऱ्यांना तब्बल 365 कोटी 5 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

या तालुक्यातील 13 हजार 918 शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ होणार असून 15 हजार 698 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, अंशतः कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा भरणा केल्यानंतरच त्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!