महाराष्ट्रात मान्सूनची दमदार एंट्री! पुढील 15 दिवस जोरदार पावसाचा अंदाज; पंजाबराव डख यांचे मोठे भाकीत

पुणे : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली आलेला नाही. अनेक भागांमध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील 15 दिवसांतील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.

डख यांच्या मते, 13 जूनपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार असून 13 ते 20 जूनदरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस सलग न पडता एक दिवसाआड पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार सरी तर काही भागांत हलका पाऊस असा विखुरलेला पाऊस पाहायला मिळू शकतो.
यंदा राज्यात पेरण्यांचे तीन टप्पे होतील, असेही डख यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 1 ते 7 जूनदरम्यान बीड जिल्ह्यातील केजच्या पुढील काही भागांमध्ये तसेच सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
दुसरा टप्पा 20 ते 30 जूनदरम्यान राहणार असून या काळात राज्यात एक-दोन मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरण्यांना आणखी वेग येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा मान्सूनच्या वाटचालीतही बदल दिसून येत असल्याचे डख यांनी नमूद केले. साधारणपणे मुंबईच्या दिशेने राज्यात पाऊस सक्रिय होतो. मात्र यावर्षी काही भागांत पावसाचे ढग तेलंगणाच्या दिशेने, तर काही भागांत कर्नाटकाच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, हवामान विभागानेही 15 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सून पोहोचण्याचा अंदाज वर्तवला असून शेतकऱ्यांचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले आहे.