कर्जमाफीसाठी आधी ५० हजारांची वसुली? पंढरपुरातून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात

पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि कर्जमाफीतील जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला.

आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधी ५० हजार रुपये भरण्याची अट घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “एका बाजूला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याकडून आधी रक्कम भरण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. ही कर्जमाफी नसून वसुलीची प्रक्रिया आहे,” अशी टीका त्यांनी केली.
रोहित पवार यांच्यासोबत आमदार राजू खरे आणि आमदार अभिजित पाटील यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावून पाठिंबा दर्शवला. प्रशासनाने वाहतूक कोंडीचे कारण देत आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली असली तरी आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी साने गुरुजींचा संदर्भ देत, “महापुरुषांनी अन्यायाविरोधात लढा दिला. आम्हीही त्याच विचारांनी प्रेरित होऊन शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत आहोत. ही लढाई कोणत्याही पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नसून सामान्य शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आहे,” असे सांगितले.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करण्याची योजना आणि एक रुपयात पीक विमा देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा सरकारसमोर ठेवली. दरम्यान, पंढरपुरातील या आंदोलनामुळे राज्यातील कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.