रात्र होताच मेडिकल्सबाहेर तरुणांची गर्दी वाढते; स्थानिक नागरिक संतप्त, नेमकं कारण काय?


पुणे : रात्री 11-12 वाजल्यानंतर शहरातील हॉटेल्स, टपऱ्या आणि खाऊगल्ल्या बंद झाल्यानंतर निगडी आणि आसपासच्या परिसरातील 24 तास सुरू असलेल्या काही औषध दुकानांबाहेर तरुणांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगत असून मोठ्याने हसण्याचा आणि वर्दळीचा आवाज परिसरात ऐकू येतो.

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना औषधे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने सुरू असलेल्या या मेडिकल स्टोअर्सबाहेर रात्रीच्या वेळी वाढणाऱ्या गर्दीमुळे स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “नेमकी ही गर्दी का होते?” असा संतप्त सवाल रहिवाशांकडून विचारला जात आहे.

माहितीनुसार, काही 24 तास सुरू असलेल्या मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांबरोबरच थंड शीतपेये, आईस्क्रीम, चिप्स, कुरकुरे आणि चॉकलेट्स यांसारख्या वस्तूंचीही विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रात्री उशिरा खाण्यापिण्यासाठी थांबणारे तरुण या ठिकाणी जमू लागले आहेत.

यामुळे निगडी प्राधिकरण, रुपीनगर, आकुर्डी, चिंचवड आणि वसंतस्मृती रुग्णालय परिसरात दररोज वाहतुकीची कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रुग्णालयात येणाऱ्या गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या गर्दीचा आणि आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

रात्री पोलिसांची गस्त असूनही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तसेच, मेडिकल स्टोअर्समध्ये अशा प्रकारे औषधांव्यतिरिक्त खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे का, आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

अन्न व औषध प्रशासन (FDA), पोलीस प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने संयुक्तपणे या दुकानांची पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!