Pune News : 20 रुपयांची सिगारेट घेण्यासाठी आले, पण वृद्धाला बसला 3 लाखांचा फटका; नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात सिगारेट खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी 67 वर्षीय वृद्ध दुकानदाराच्या गळ्यातील तब्बल 3 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सान्निध्य गृह वसाहतीत दुकान चालवणारे 67 वर्षीय व्यावसायिक 6 जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकानात बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात तरुण दुकानासमोर थांबले.
त्यापैकी एकाने दुकानात येत सिगारेटची मागणी केली. दुकानदार सिगारेट काढण्यासाठी खाली वाकले असताना, चोरट्याने संधी साधत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. त्यानंतर तो बाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेत सुमारे 3 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन चोरीला गेली असून अचानक घडलेल्या प्रकारामुळे वृद्ध दुकानदार हादरून गेले आहेत.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेड पुढील तपास करत आहेत.