दूध भेसळीविरोधात मोठी मोहीम! तुकाराम मुंढेंनी बोलावली राज्यस्तरीय बैठक..


पुणे : राज्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहीम तीव्र केली असून, या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

ही बैठक शुक्रवारी (12 जून) दुपारी 2 वाजता मुंबईतील अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात आयोजित करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची मते जाणून घेत पुढील कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) म. ना. चौधरी यांनी यासंदर्भात दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाला पत्र पाठवले असून, सहकारी दूध संघांचे अध्यक्ष, सचिव आणि प्रतिनिधींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळीविरोधात राज्यभर कठोर कारवाई सुरू केली आहे. विशेषतः दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळखोरांविरोधातील मोहिमेमुळे बाजारात दर्जेदार उत्पादनांना मागणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

या कारवाईमुळे ग्राहकांचा विश्वास वाढला असून सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना अधिक पसंती मिळत आहे. याचा थेट फायदा दूध उद्योगाला आणि पर्यायाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुणवत्तापूर्ण दुधाला अधिक दर मिळण्यासही या मोहिमेमुळे मदत होऊ शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!