पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण–हिंजवडी मेट्रो लवकरच धावणार, मुहूर्त ठरला


पुणे : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर असून माण–हिंजवडी मेट्रो सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून या मेट्रोची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. माण–हिंजवडी ते बाणेर (रामनगर) या पहिल्या टप्प्यातील सर्व प्रलंबित कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानंतर 15 जुलैपर्यंत या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. पुढील टप्प्यात ऑगस्टपर्यंत ही मेट्रो शिवाजीनगरपर्यंत विस्तारण्याची शक्यता असून त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत प्रकल्पाचा आढावा देत माहिती दिली की, माण–हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून काही तांत्रिक प्रक्रिया प्रलंबित आहेत.

पहिल्या टप्प्यातील 12 स्थानकांची 15 ते 20 जून दरम्यान सुरक्षा आणि तांत्रिक तपासणी होणार आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सेवा सुरू केली जाणार आहे. संपूर्ण प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यानंतर मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

23 स्थानकांचा आणि 23.2 किलोमीटर लांबीचा हा उन्नत मेट्रो मार्ग PPP मॉडेल अंतर्गत विकसित केला जात असून हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पात टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (TRIL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स हे खाजगी भागीदार आहेत. प्रकल्पाचा अंदाजे खर्च 8,331 कोटी रुपये आहे.

दरम्यान, पीएमआरडीएमध्ये कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी सिंगल विंडो इनवर्ड-आउटवर्ड प्रणाली सुरू केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी MPSC मार्फत 70 लिपिकांची भरती केली जाणार असून काही अधिकारी प्रतिनियुक्तीवर आणले जाणार आहेत.

चाकण परिसरातील रस्त्यांची कामे पीएमआरडीए स्वतः हाती घेणार आहे. तसेच रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून सर्व तांत्रिक व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर कामाला गती दिली जाणार आहे. पुण्यातील ट्विन टनेल प्रकल्प सध्या मंजुरीच्या टप्प्यात असून लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!