लोणी काळभोर येथील भरतनाट्यम ग्रुप देशात प्रथम, विद्यार्थ्यांची डान्स स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी..


लोणी काळभोर : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत उत्सव’ नृत्य स्पर्धेत लोणी काळभोरच्या नटराज डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी नेत्रदीपक कामगिरी करत भरतनाट्यम ग्रुप डान्सने प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून सुमारे ३,५०० कलाकार सहभागी झाले होते .

अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ पर्व-३ चे विजेते समर्पण लांबा यांची उपस्थिती होती. यावेळी अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनचे सचिव डॉ. प्रमोद ननवरे यांच्यासह देशभरातील हजारो स्पर्धक आणि कलारसिक उपस्थित होते.

या स्पर्धेत नटराज डान्स अकॅडमीचे प्रमुख सुयश सुरवसे यांना नृत्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय कलाक्षेत्रम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना सातत्याने राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देणाऱ्या सुरवसे यांच्या कार्याचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विविध गटांमध्ये नटराज डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामध्ये श्रेयश्री राऊत (द्वितीय क्रमांक) तर अजय वाघमारे, शरण्या लोंढे, समृद्धी लोंढ, प्रिन्सिका लोणकर व अद्विका फुलमंते यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे . तसेच एकपात्री नाट्य स्पर्धेत थेऊर येथील अजय विजय वाघमारे याने द्वितीय क्रमांक मिळवत आपली वेगळी छाप पाडली.

राष्ट्रीय स्तरावरील या यशानंतर नोव्हेंबर महिन्यात व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी नटराज डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या यशामागे अकॅडमीचे प्रमुख सुयश सुरवसे यांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल लोणी काळभोर, थेऊर परिसरातील नागरिक आणि पालकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!