नवले पुलावर पुन्हा मृत्यूचा सापळा! भरधाव सिमेंट मिक्सर पलटी, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


पुणे : पुण्यातील नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने आलेला सिमेंट मिक्सर पलटी होऊन थेट दुचाकीवर कोसळल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.

मृत तरुणाचे नाव रामेश्वर मच्छिंद्र भोगले (वय ३१) असे असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात इतका भीषण होता की त्यांना वाचण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता पल्स हॉस्पिटलजवळ घडला. कात्रजकडून बावधनच्या दिशेने जाणारा सिमेंट मिक्सर तीव्र वळणावर चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि रस्त्यावर पलटी झाला.

त्याच वेळी बाजूने जाणारी दुचाकी मिक्सरखाली दबली गेली.
या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मिक्सर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर काही काळ कात्रज–देहूरोड बायपासवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने वाहतूक पूर्ववत केली असून, मिक्सर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास नऱ्हे पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!