राज्य सरकारचा मोठा निर्णय! वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ..

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (९ जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला. मागील कर्जमाफी योजनांमध्ये पात्र असूनही विविध तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारने २०१७ मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि २०१९ मधील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पात्र ठरूनही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटी, कागदपत्रांतील अडचणी आणि निकषांच्या गुंतागुंतीमुळे हजारो शेतकरी या योजनांपासून वंचित राहिले होते.
या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफ होणार असून त्यांना पुन्हा नव्याने पीक कर्ज घेण्याचा मार्ग खुला होणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा हलका होणार आहे. योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश सहकार आणि वित्त विभागाला देण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून लाभ थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
